हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे

शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे तेजस्वी व्यक्‍तिमत्त्व म्हणजे प्रबोधनकारांचा प्रगल्भ वारसा असणारे एक नेतृत्व ! बाळासाहेब म्हणजे एक आगळा-वेगळा मनस्वीपणा !! शिवसेनाप्रमुख म्हणजे परिणामांची चिंता न करता ठाम पणे वर्तन करणारा ज्येष्ठ राजकीय नेता !!! बाळासाहेब म्हणजे जबर आक्रमकता ! दिलेल्या शब्दाला शंभर टक्‍के जागणारे नेतृत्व !! बाळासाहेब म्हणजे हिंदुत्वाचा एक श्वास, ज्वलंत हिंदुत्वाचा एक हुंकारच !!! बाळासाहेबांच्या नेतृत्वाचे मूल्यमापन करणे हे तसे फार कठीण आहे, कारण राजकीय क्षेत्रातील हा एक सरळ-साधा माणूस आहे. त्यामूळे बाळासाहेबांशी वागणे फार सोपे जाते. जे मनात, तेच ओठात असते. त्यात कोणतीही फसवेगिरी नाही. बोलणे पण रोखठोक ! ‘पटलं तर बोला अन्यथा, विषयच सोडा’ या स्वभावामुळे सध्याच्या दगदगीच्या व स्वार्थी राजकीय जीवनातही त्यांचा वेगळा असा ठसा उमटला आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मूळचे एक व्यंगचित्रकार. त्यांचे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिक. त्यातील काही व्यंगचित्रे अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. व्यक्‍तिचे नीट निरीक्षण करणे, तिच्यातील व्यंग शोधून काढणे, व्यंगचित्राद्वारे ते चित्र अचूक तुमच्यासमोर उभे करणे यात बाळासाहेबांचा हात क्‍वचितच कोणी धरू शकेल. म्हणूनच बाळासाहेब म्हणतात की, “ मी शिवसेना प्रमुख झालो त्याचं कारण माझी व्यंगचित्रकला.”

ज्यावेळी हिंदुस्थानात हिदूंना मरगळ येत होती, त्यावेळी तेही त्यांनी ओळखले आणि शिवसैनिकांना जेव्हा धाडसी नेतृत्वाची जरूरी होती त्या त्या वेळी शिवसेनाप्रमुख मागे राहिले नाहीत तर हिमतीने पुढे गेले. एकदा आदेश दिल्यानंतर “माझा तो आदेश नव्हताच” असे ते म्हणाले नाहीत. म्हणूनच बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर एका नेत्याने जेव्हा अशी भूमिका घेतली की, बाबरी मशीद पाडणारे शिवसैनिक होते, त्यावेळी बाळासाहेब ठामपणे म्हणाले, “ते शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान वाटतो.” पळपुटेपणा त्यांना स्पर्शच करू शकत नाही. लोकांची, कार्यकर्त्यांची नाडी ते अचूक ओळखतात आणि म्हणुनच शिवसेना फोफावते, वाढते. महाराष्ट्रात भगवा ध्वज फडकतो तर या शंभर कोटी देशाच्या लोकसभेचा अध्यक्ष शिवसेनेचा होता.

विशेष म्हणजे महापौरपद, मुख्यमंत्रीपद, लोकसभेचे अध्यक्षपद किंवा कोणत्याही मोठ्या पदाचा शिवसेनाप्रमुखांना कधीच मोह होत नाही. “कोणत्याही निवडणुकीला मी उभा रहाणार नाही किंवा कोणतेही राजकीय पद मी स्वीकारणार नाही” असे म्हणणारा राजकीय नेता फक्त बाळासाहेबच. ‘वक्‍ता दशसहस्त्रेषू’ असे म्हणतात. दहा हजारात एखादाच माणूस चांगला वक्‍ता होतो आणि एखाद्या माणसाच्या प्रत्येक सभेला कमीत कमी लाख लोक उपस्थित रहातात. त्यांचे भाषण म्हणजे ढगांचा गडगडाट, विद्युल्लतेचा लखलखाट आणि विचारांचा महामंत्र. आणि एवढे असूनही शिवसेनाप्रमुख कृत्रिम वाटले नाहीत. ते सरळसळ समोरच्या प्रत्येक माणसाशी सहजपणे बोलतात, जवळीक साधतात. त्यांच्या भाषणातील लोकांना आकर्षित करणारा आणखी एक गुण म्हणजे त्यांचा विनोद. कधी तो भाषणात येतो तर कधी मुलाखतीत. कधी ‘मार्मिक’ च्या किंवा ‘सामना’ च्या अग्रलेखात, तर कधी सहज गप्पा मारताना. सोप्या सोप्या गोष्टीसुध्दा कधी कधी ते सांगतात.

तरीसुध्दा आत्तापर्यंत जे काही मला कळले, मला भेटलेल्या लोकांनी जे काही मला सांगितले त्यावरून एक गोष्ट मात्र नक्‍कीच सिध्द झालेली आहे की काहीही असले तरी हा माणूस वाघ आहे. अगदी अंगभर पट्टे असलेल्या ढाण्या वाघ आहे!(Referenced by Shivsena.com)

पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे

सामाजिक कामांच्या माध्यमातून शिवसेनेला 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये पोहोचविण्याचे काम केले ते उद्धव ठाकरे यांनीच. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख जसे 'लोकमान्य' बनले तसेच उद्धव ठाकरे हेही आपल्या कामातून विश्वविक्रमी 'लोकनायक' बनले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी पक्षाबाहेर अनेक मतमतांतरे आहेत. शिवसेनाप्रमुखांचा वारसा ते समर्थपणे चालवू शकतील का, असाही प्रश्न यापूर्वी अनेकदा उपस्थित करण्यात आला होता. बाळासाहेबांचा आक्रमक स्वभाव, त्यांचे आक्रमक भाषण करून विरोधकांना नामोहरम करून टाकण्याची शैली, या गोष्टी उद्धव ठाकरे यांच्याकडे नाहीत असे मानणारा एक वर्ग आहे. स्वत: उद्धव ठाकरे हेही आपण शिवसेनाप्रमुखांसारखे भाषण करू शकत नाही हे मान्य करतात. बाळासाहेबांसारखे व्यक्तीमत्व हे शतकातून एखाद्यावेळीच जन्माला येते त्यामुळे त्यांच्यासारखे दुसरे कोणी असूच शकत नाही, असे स्पष्टपणे ते सांगतात. मग उद्धव ठाकरे यांच्यामध्ये असे नेमके असे काय आहे की त्यांनाही सर्व सामान्य शिवसैनिक आपला नेता मानतो. शिवसेनाप्रमुखांसारखा करिष्मा नसूनही त्यांच्यावर सर्वांचा विश्वास का आहे, सौम्य व्यक्तीमत्व असूनही त्यांच्याविषयी शिवसेनेत आदरयुक्त भीती का निर्माण झाली आहे... या आणि अशासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे खरे तर खूप सोपी आहेत.

सौम्य असले तरी ते आपल्या भूमिकेवर अत्यंत ठाम असतात. दिलेल्या शब्दाला ते जागतात. उगाच नेत्याची झुल पांघरून न बसता अथवा बडेजाव न करता थेट कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतात. विशेष म्हणजे खोटेपणाची व चमचेगिरीची चिड असलेले उद्धव ठाकरे हे जनसामान्यांची कामे करण्याला प्राधान्य देतात. सत्ता हे केवळ साध्य नसून लोकांची कामे करण्याचे साधन आहे असे उद्धव यांचे मत आहे. त्यामुळेच बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या शिवसैनिकांनाही ते आपलेसे वाटतात. राजकारणापेक्षा समाजकारणात रमणारे असे त्यांचे व्यक्तीमत्व आहे.(Referenced by Shivsena.com)